Pune: पत्नीला आणि मुलाला सांभाळणे पतीची जबाबदारी

पुणे – पत्नीला सांभाळणे पतीची नैतिक जबाबदारी आहे. पतीचे नोकरीसह शेतीतून चांगले उत्पन्न असल्याचे दिसून येत आहे. उदरर्निवाह आणि दोन्ही लहान मुलांच्या संगोपनासाठी तिला पैशाची गरज असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.
तसेच, ती राहत असलेल्या ठिकाणी, माहेरी, अथवा रस्त्यावर कुठेहे तिला शिवीगाळ, दमदाटी करू नये. न्यायालयाच्या परवानगी शिवाय परस्पर मुलांना घेऊन जाऊ नये, असे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी आदेशात म्हटले आहे. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) दोघे एकाच ठिकाणी शिकत होते. त्यातून दोघांना प्रेम झाले. त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये विवाह केला. त्यातून दोघांना दोन मुले आहेत.
काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. त्याने दुसरा विवाह केल्याचे तिला आढळून आले आहे. याबाबत विचारणा केली असत तिला कोंडून ठेवले. त्यानंतर त्रास देऊन तिला माहेरी जाण्यास भाग पाडले. त्यामुळे तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला आहे. यामध्ये पोटगीची मागणी केली आहे. तिच्या वतीने कौटुंबिक न्यायालय येथील द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॅड. कल्पना निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली.
अर्जदार यांचे तुटपुंजे उत्पन्न आहे. माधव दोन्ही मुलांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी टाळत आहेत. तो नोकरी करत असून, चांगला पगार आहे. शिवाय शेतीतून आणि घरातील इतर व्यक्तींचेही चांगले उत्पन्न आहे. त्यामुळे दरमहा ३५ हजार् रुपये पोटगीची मागणी केली. यास पतीने विरोध केला. ती नोकरी करत असल्याचे न्यायालयात् सांगितले. मात्र, त्याने दाखल केलेल्या पुराव्यावरून तिचे उत्पन्न तुटपुंजे असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक खर्च, उदरनिर्वाहसाठी पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला.
“पत्नी, मुलांना सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी पतीची आहे. पती त्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नसल्याचा निष्कर्ष काढत पोटगीचा आदेश दिला आहे. त्यामुळे तिला न्याय मिळाला आहे.” – अॅड . कल्पना निकम, द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.





