Pune : एचएसआरपीला आणखी मुदतवाढ

पुणे : राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा दोन महिन्यांची (दि. ३० जून) मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुण्यात २६ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्याचे एका कंपनीला काम दिले असून, ही नंबरप्लेट बसविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी अधिक कालावधी जात आहे.
आत्तापर्यंत अडीच लाख चालकांनी नोंदणी केली असून, त्यातील केवळ ४५ हजार नंबर प्लेट बसवून झाल्या आहेत. त्यामुळे पुढील महिनाभरात जवळपास २३ लाख नंबरप्लेट नोंदणी होणार कशी आणि २५ लाख नंबरप्लेट बसविणार कधी, असा प्रश्न आहे. त्यात एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास दंडाची भीती असल्याने नागरिकांकडून नोंदणीची लगबग सुरू आहे.
मात्र, नंबर प्लेट बसविण्याची तारीख मे आणि जून महिन्यातील मिळत आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारी (दि. २०) परिवहन विभागाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.





