Pune Hit and Run Case: रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केली, दोन तासात 48 हजार….; आरोपीने पोलिसांना दिली माहिती

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने रविवारी रात्री मित्रांबरोबर पार्टी केली. दोन तासात त्याने मद्य, तसेच जेवणावर 48 हजार रुपये खर्च केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली हाेती. मित्रांबरोबर तो रविवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीसाठी जाताना त्याने वडिलांकडून मोटार घेतली होती. मुलगा मद्यप्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक वडिलांना होती.
अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. तेथे त्यांनी जेवण केले. दोन तासात मुलाने मद्यपार्टीवर ४८ हजार रुपये खर्च केले.
पोलिसांनी दोन्ही हाॅटेलमधील चित्रीकरण तपासले. तेव्हा मुलगा आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले आहे. हाॅटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन अदा केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.
मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८५ ची कलमवाढ –
कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलावर आता दारू पिऊन गाडी चालविल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी भादंवि ३०४, ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८४, ११९ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पुणे पोलिसांनी कलमवाढ करून दारू पिऊन गाडी चालविल्या प्रकरणात लावण्यात येणारे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या १८५ ची कलमवाढ केली आहे.
काय आहे प्रकरण ?
पुण्यातील कल्याणी नगर भागात भरधाव पोर्श कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. कारचालक हा पुण्यातली बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं पण तो साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला जामीन देण्यात आला.
ज्यानंतर संताप व्यक्त होतो आहे. पोलिसांनी कारचालकाला म्हणजेच त्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा आणि बर्गर आणून दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केला. तसंच पुण्यातल्या तरुणांनी एकत्र येत पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवला.
या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी संवाद साधला होता. आज देवेंद्र फडणवीस हे थेट पुण्यात पोहचले होते त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसंच कुठल्याही दबावाची पर्वा न करता कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी राजकीय दबावाची पर्वा न करता कारवाई करा असे निर्देश दिले आहेत.





