शंभुराज देसाईंच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार,’एक आई, बहीण, मुलगी आणि शिक्षिका म्हणून सांगते’

Porsche car accident | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही नुकतीच शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तर देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दाव ठोकण्याचा इशारा दिला आहे. नुसते हवेत आरोप करू नका. पुरावे द्या. नाही तर तुमच्यावर दावा ठोकेल, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे यांचा सवाल
‘एक्ससाईज खात्याबद्दल तर न बोलले बरं, मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत. विशेषत: शंभूराज देसाई यांनी एक्ससाईज खातं संभाळलं असेल, तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्सचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं?, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’ही एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत बसतात. खर म्हणलं तर ज्यांनी तंबाखू, गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केले पाहिजे, ते स्वतः सभागृहात तंबाखू सोडत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर नुकसानीचा दावा टाकेल मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात. मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांनी जे विचारले त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात हे शंभूराजेंना कदाचित ज्ञात नसेल, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
त्यांनी देसाई यांना आव्हान देताना म्हटले,’राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा, असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा एकदा पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सांगते, जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलिकडे जाऊन, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना आणि केसेस, धमक्याना भीक न घालता माझी लढाई चालू ठेवणार आहे.’ असेही ते म्हणाले आहे.





