Pune : लोकाभिमुख कामांद्वारे वंचितांना मदत करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम करताना लोकाभिमुख काम करून, समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मदत करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, की सारथी ही संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कार्यरत असून, त्यांच्या नावाला साजेसे असे काम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करावे. संस्थेच्या माध्यमातून आपणास जे यश मिळाले आहे, त्याचे अनुभव इतरांना सांगून, सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समर्पक भावनेतून मदत करावी.
निंबाळकर म्हणाले, की महाराष्ट्रात १९८० च्या दशकात युपीएससी व एमपीएससीमध्ये निवड होण्याचे प्रमाण नगण्य होते. गेल्या ४ ते ५ वर्षांत त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. फक्त रोजगाराबाबतच नाहीतर समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.
या वेळी सारथी संस्थेचे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती पाटणकर, तर आभार उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी मानले.





