Pune : गंगाधाम चौकात जड वाहनांना २४ तास बंदी

पुणे – गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दीपाली सोनी यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलीस दलाने या परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यानुसार मार्केट यार्ड वाहतूक विभागाअंतर्गत कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक, टिळेकर चौक ते गंगाधाम चौक दरम्यानच्या रस्त्यांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व इतर सर्व जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी येण्या- जाण्यास २४ तास बंदी घालण्यात आली आहे.
लुल्लानगर चौक- गंगाधाम चौक – चंद्रलोक हॉस्पिटल चौक व गंगाधाम चौक- वखार महामंडळ चौक- सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व इतर सर्व जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी येण्या जाण्यास सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
या ठिकाणी २४ तास वाहतूक अंमलदार नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने जड वाहनांमुळे अपघात होत असून, या रस्त्यावर कान्हा हॉटेल, पासलकर चौक, भवानी माता मंदिर, आई माता मंदिर, वाय जंक्शन, गंगाधाम बसस्टॉप येथे आयआरसी नियमाप्रमाणे हाइट बॅरिअर बसवावेत. जेणेकरून जड वाहनांना प्रवेश बंद होईल, तसेच आई माता मंदिर येथील रम्बलर जीर्ण झालेली असल्याने आयआरसी नियमाप्रमाणे उच्च दर्जाचे रम्बलर व गतिरोधक बसविण्याबाबत महापालिकेच्या मुख्य अभियंता यांना कळविण्यात आले आहे.
गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतरच हे निर्णय घेण्यात आले आहेत.





