Pune : एल निनोच्या स्थितीमुळे उष्णतेची लाट

पुणे : उत्तर आणि ईशान्य भारताच्या तुलनेत, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात (मध्य आणि वायव्य भारत) एल निनोची स्थिती पाहता या वर्षात अधिक उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या शास्त्रज्ञांनी नव्याने केलेल्या संशोधनातून हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
तसेच ‘इन्सो लिंक्ड कॉन्ट्रास्टिंग हीट वेव्ह पॅटर्न ओव्हर द इंडियन रिजन’ या शीर्षकाचा अभ्यास, ६ एप्रिल रोजी ‘क्लायमेट डायनॅमिक्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. एस. डी. सानप, पी. प्रिया, जे. एस. चौधरी, डी. आर. पट्टनायक यांच्यासह आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी या अभ्यासात भाग घेतला.
सन २०२२ मध्ये याच काळात मध्य आणि उत्तर भारतात एल निनोची तीव्रता दिसून आली होती. मात्र, आता वातावरणाचा अभ्यास करून उपरोक्त अंदाज वर्तविण्यात आला आहे. एल निनो वर्षांमध्ये, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्यपेक्षा जास्त कमाल तापमान, वाढलेली उष्णतेच्या लाटेची घटना आणि कमी पर्जन्यमान अनुभवले जाते. याउलट, वायव्य भारतात सामान्यपेक्षा थंड तापमान आणि जास्त पर्जन्यमान दिसून येते.
या अभ्यासामुळे आम्हाला वातावरणीय परिस्थिती आणि हवामानावर त्यांचा प्रभाव समजून घेण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्याचा अंदाज सुधारण्याला यामुळे आम्हाला मदत होईल. या अभ्यासाद्वारे उष्णतेच्या लाटेच्या नमुन्यांचे संशोधन योग्य प्रकारे झाले आहे, अशी माहिती या संशोधनातील सहभागी आणि आयएमडी पुणे येथील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली, तसेच त्यांनी या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुढे उष्णतेच्या लाटेचे नमुने समजून घेण्यासाठी जागतिक स्तरावर इतर टेलिकनेक्शन नमुन्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, तसेच उष्णतेच्या लाटेवर परिणाम करणारे इतर अनेक घटक आहेत ज्यात उष्णतेच्या लाटेच्या अंदाजात स्थानिक वातावरणीय घडामोडींचा समावेश आहे, असेही सानप म्हणाले.





