पुणे – पुण्यात शुक्रवारी (दि. २०) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत आहे. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम पालखींचे दर्शन घेऊन शहरात स्वागत करणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीने वारकर्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सोयिसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत शहरात दोन्ही पालखी मार्गांवर ३६ ठिकाणी आरोग्य पथके उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाळामुळे अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात औषध फवारणी करण्यात आली आहे. तर दोन्ही पालखी मार्गावर ३६ ठिकाणी आरोग्य पथके उपलब्ध करून दिली आहेत. पालखी आगमन काळात शहरातील सर्व पालिकेचे दवाखाने ओपीडी, सर्व मॅटरनिटी होममध्ये मोफत विनामूल्य सुविधा उपलब्ध असतील. दवाखान्यात एक डॉक्टर, एक नर्स आणि एक सहायक अशी व्यवस्था प्रत्येक बूथवर असेल. आरोग्य सेवेसाठी सुमारे दीडशे ते दोनशे जणांचा समावेश असणार आहे. भवानी पेठेतील पालिकेच्या रुग्णालयात फिजिओ थेरपीची व्यवस्था असेल. शहरात फिरते दवाखाने असून, पुणे ते पंढरपूरदरम्यान डॉक्टर, नर्स, सहायकांसह रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे महापालिकेचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.