Pune : राज्यात प्रथमच जाहीर होणार आरोग्य धोरण

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा-मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र आरोग्य विषयक धोरण (राज्य आरोग्य धोरण) बनविण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. भविष्यात महाराष्ट्रात आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सहसचिव विजय लहाने, उपसचिव अशोक अत्राम, शिवदास धुळे, दीपक केंद्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना प्रवासात अनेक अडचणींचा सामोरे जावे लागते.
त्यामुळे त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी ग्रामीण रुग्णालय (50 खाटा) आणि उपजिल्हा रुग्णालय स्तरावर शिबिर आयोजित करून निकषानुसार तपासणी करून प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावे, असा सूचना दिल्या आहेत.
तर दिव्यांगांना बोगस प्रमाणपत्रे देणारे आणि त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे आदेश…
– जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय बिले दाखल झाल्यावर सात दिवसांत मार्गी लावावे
– जागतिक कर्करोग दिन राज्य, जिल्हा स्तरावर व सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावीपणे राबविणे
– महिला कर्करोग रुग्णांसाठी तपासणी शिबिरे राबवावी; आवश्यक ते उपचार विनामूल्य उपलब्ध करुन द्यावेत
– स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती प्रसिद्धी करावी
– आरोग्य संस्थामधील “ब’ वर्गातील डॉक्टरांच्या रिक्त जागा तात्काळ भरावे




