Pune : हापूस आला आवाक्यात

पुणे : गुढीपाडव्याच्या सणानंतर मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मागील आठवड्यात दिवसाला एक ते दोन हजार पेट्यांची होणारी आवक वाढून आता चार ते पाच हजार पेट्यांवर पोहोचली आहे. त्यातच सणानंतर मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे हापूसचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हापूसच्या भावात डझनामागे दर्जानुसार ३०० ते ६०० रुपयांची घसरण झाली आहे.
किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची ७०० ते १२०० रुपयांना विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात डझनाला १ हजार ते १८०० रुपये भाव मिळत होता. यंदा हवामान बदलाचा फटका कोकणातील हापूसला बसला आहे. नेहमीच्या तुलनेत ४० टक्के उत्पादन कमी होणार आहे. पहिला मोहोर पडल्याने सुरुवातीला आवक कमी होती. दरवर्षी गुढीपाडव्याला मुबलक आवक होत होती. मात्र, यंदा आवक कमी झाली आहे. आता, गुढीपाडव्यानंतर आवक वाढली आहे.
ढगाळ वातावरणाचा धोका नाही
राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, आंब्याला त्याचा धोका नाही. मात्र, वादळी पाऊस झाल्यास आंब्याची गळ मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर, उत्पादनात घट होऊन आंब्याच्या आवकेतही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात बाजारातील आंब्याची आवक ही हवामानावर अवलंबून राहील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
कोकणातून हापूसची आवक वाढली आहे. दि. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आवक जास्त होणार आहे. त्यावेळी भावात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ३० जूनपर्यंत हंगाम असतो. मात्र, तो यंदा १५ ते २० दिवस आधीच संपण्याचा अंदाज आहे.
– युवराज काची, आंबा व्यापारी, मार्केट यार्ड





