Pune : हापूसला हवामान बदलाचा फटका

पुणे : लांबलेला परतीचा पाऊस…अपेक्षित न पडलेली थंडी…आता वाढलेला ऊनाचा पारा… या परिस्थितीचा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. पहिल्या बहरातील आंब्यांचा मोहोर गळून पडल्याने पिकावर परिणाम झाला आहे. नेहमीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचे दर चढे आहेत. संपूर्ण हंगामात ते तेजीतच राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
हापूस आंब्यांच्या आगमनाची उत्सुकता आबालवृद्धांना असते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आंब्यांचा हंगाम सुरू होताे साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आवक वाढण्यास सुरूवात होते. मार्च महिन्यात मोठी आवक होत असते. गुढी पाडव्याला आंब्याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. यंदा आंब्यांची आवक अतिशय कमी प्रमाणावर झाली आहे.
मार्चमध्ये दरवर्षी मार्केट यार्डातील फळ बाजारात कोकणातून दररोज ४ ते ५ हजार पेट्यांची आवक होते. सध्या मात्र बाजारात दररोज ७०० ते १ हजार पेटी आंब्याची आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही अतिशय कमी आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये आंब्याची आवक वाढेल. दरवर्षी साधारणपणे २० मेपर्यंत हंगाम सुरू असतो. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक सुरू राहिल, असेही सांगण्यात आले.
हापूसचे डझनाचे दर
मार्च २०२४ – ८०० ते १२०० रुपये
मार्च २०२५- १५०० ते २०००
हवामान बदलामुळे उत्पादन घटले असून, सध्या आंब्याची आवक कमी होत आहे. एप्रिलममध्ये मात्र आवक वाढेल. त्यावेळी भावात घट होईल. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाव २५ ते ३० टक्के जास्त असणार आहेत.
– युवराज काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्डगुढी पाडवा, अक्षय्य तृतीयेला आंब्यांना मागणी वाढते. अनेक जण गुढी पाडव्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आंबा खरेदी करतात. ३० मार्च रोजी गुढी पाडवा आहे. यंदा पाडव्याला आंब्याचे भाव चढेच राहणार आहेत.
– अरविंद मोरे, रत्नागिरी आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्डऑक्टोबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस सुरू होता. यंदा अपेक्षित थंडीही पडली नाही. प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर आला नाही. त्यानंतर उष्मा वाढल्याने मोहोर गळून पडला. फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेले उत्पादन मिळाले नाही. यंदा आंब्यांचा हंगाम लवकर संपेल.
– मंदार कदम, आंबा उत्पादक शेतकरी, गावखेडी, पावस, जि. रत्नागिरी





