पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग न्यायालयाने मोकळा केल्यानंतर मागील तीन वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक निकाल अपेक्षित असल्याने आम्ही तयारच आहोत.. आता फक्त आमनेसामने निवडणुकाच होऊ द्या… ! अशा शब्दांत शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता राज्य शासनाने, तसेच निवडणूक आयोगाने या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांंनी केली आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वेळेसच्या निवडणुकीचा कालावधी संपला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे. उद्या म्हटले तरी आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महायुतीचे जे धोरण ठरेल, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवू. – दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळाचीही तयारी न्यायालयच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत, तसेच निवडणुकीबाबतची ४ आठवड्यांत अधिसूचना काढण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. आमच्या पक्षाची निवडणुकीची तयारी आहे. महाविकास आघाडीसोबत किंवा स्वबळावरही लढण्याची आमची तयारी आहे. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष न्यायालय आदेश देऊ शकते, याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही तयारीतच होतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नुकत्याचा पार पडल्या आहेत. सर्व कागदोपत्री आमची तयारी झालेली आहे. प्रभागनिहाय आम्ही निरीक्षक नेमले आहेत, तसेच आमच्या बूथ कमिट्याही तयार आहेत. त्यामुळे आमची टीम निवडणुकीसाठी तयार आहे. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष. न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. आदेशाचे आता राज्य शासनाला कार्यवाही करावीच लागणार आहे. मात्र, इतर केस देखील अद्याप पेंडिंग आहेत. त्याचे काय होणार, हाही प्रश्न आहे. निवडणुका चार महिन्यांत काय चार दिवसांत घेतल्या, तरी आमची सामोरे जाण्याची तयारी आहे. याबाबतच्या ज्या केसेस पेंडिंग आहेत, त्याचे कारण पुढे करून राज्य शासन निवडणूक लांबणीवर टाकेल. – संजय मोरे, शहरप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. संघटनात्मक रचना तयार झाली असून, सर्व कमिट्यांची बांधणी झालेली आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. आमच्या पक्षाचे शंभर माजी नगरसेवक आहेत. त्यात अजून इतर पक्षांतील पाच माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळणार आहे. या १०५ जागा निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी लागलो आहोत. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप. सर्वसामान्य जनता आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांकडून मा. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे स्वागतच असणार आहे. पक्षाचे नेते राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची सध्या चर्चा नाही. – साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. अखेर लोकशाहीचा विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मनसे कधीही कुठेही सज्ज आहे. मात्र, शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करावी कोणताही वेळकाढूपणा करू नये एवढीच अपेक्षा – राजेंद्र वासगकर ( मनसे नेते) न्यायालयाने निवडणुका घेण्यास सांगणे म्हणजे महाराष्ट्र सरकारला चपराक आहे. स्थानिक नेतृत्वाशिवाय राज्य सरकार सर्व संस्था मागील ३ ते ५ वर्षांपासून चालवत आहेत. निवडणूका नसल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यातच प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी सभागृहात नगरसेवक नाही. त्यामुळे आता वेळ न घालविता तातडीने निवडणुका घेणे अपेक्षित आहे. – सुदर्शन जगदाळे ( शहराध्यक्ष, आप) सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत करतो. निवडणुका न झाल्याने शहराचा विकास थांबला होता. नागरिकांंना स्थानिक पातळीवर दैनंदिन सोयीसुविधांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने आता तातडीने निवडणुका घेणे उचित ठरेल. – प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे (शहरप्रमुख, शिवसेना)