Pune Grand Tour 2026: सायकल रांगोळी, तिरंगा अन् टाळ्यांचा कडकडाट; पुरंदरच्या मातीत सायकलपटूंचे भन्नाट स्वागत

प्रभात वृत्तसेवा
गराडे : पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६’ अंतर्गत स्पर्धेचा दुसरा टप्पा बुधवारी (दि. २१) राेजी उत्साहात पार पडला. देशातील सर्वात मोठी सायकल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेसमध्ये पुरंदर तालुक्याने आदरातिथ्याने परदेशी सायकलपटूंची मने जिंकली. आव्हानात्मक मार्गावर पुरंदरचा निसर्ग आणि गडकिल्ल्यांचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आला.
कॅम्प येथील लेडीज क्लब येथून रेसला सुरुवात झाली. खरी चुरस पाहायला मिळाली ती बोपदेव घाटात. दुपारी १ वाजता सायकलपटूंचा ताफा अवघड चढण असलेला बोपदेव घाट चढून पुरंदर तालुक्यात दाखल झाला. घाटात अखेरच्या टप्प्यात काही लहान मुलं आणि नागरीकांनी स्पर्धकांचे स्वागत करून प्रोत्साहन दिले.
बोपदेव माची येथे प्रवेश करताच बोबदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागतकमान तसेच पुढे आस्करवाडी व पठारवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी स्पर्धकांचे स्वागत केले. भिवरी येथे ग्रामपंचायत तसेच विद्यार्थांनी तसेच येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच राष्ट्र सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी सायकल रांगोळी काढत आणि तिरंगा उंचावत स्पर्धकांचे स्वागत केले.
पुढे बोपगाव येथे ग्रामस्थांनी स्वागतकमान उभारून ‘ परदेशी पाहुण्यांचे’ स्वागत केले. चांबळी येथे चांबळी व हिवरेतील विद्यार्थांनी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.स्पर्धा जसजशी पुढे सरकली, तसतसा उत्साह वाढत गेला. कोडीत आणि नारायणपूर या गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पुरंदर किल्ल्याच्या पश्चिम पायथ्याशी असलेल्या चिव्हेवाडी घाटात महादेव कोळी बांधवांनीही सायकलपटूंचे स्वागत केले.
प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वळणाच्या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहून स्वागत करीत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे स्वागत केले. पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीतून ही स्पर्धा पुढे भोर तालुक्यात मार्गस्थ झाली. दरम्यान, पुरंदरमधील मार्गावर कोणतीही दुर्घटना झाली नाही तसेच कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही असे सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.
“सध्या पुण्यातील प्रदुषण पाहता जास्तीत जास्त सायकलचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी सातत्याने अशा स्पर्धा होणे आवश्यक आहे. लहान मुलांना सायकल वापराची आवड निर्माण व्हावी यासाठी अर्नव आणि आदित्य या माझ्या नातवांना ही स्पर्धा पाहण्यासाठी बोपदेव घाटात घेऊन आलो आहे. ही स्पर्धा पाहून लहान मुलांना प्रोत्साहन मिळेल.”
– जगन्नाथ खराबे, ज्येष्ठ नागरिक कोंढवा.





