Pune Gramin | अखेरचे रक्षाबंधन! ; राखीच्या धाग्यांत गुंतलेले अश्रू आणि अनोख्या निरोपाने गहिवरलेले गाव..

प्रभात वृत्तसेवा
नीरा (राहुल शिंदे ) – रक्षाबंधन हे भाऊ- बहिणीच्या नात्याचं हे नाजूक पण अतूट बंधन. पण पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे घडलेला एक हृदयविदारक प्रसंग या बंधनाची वेगळीच जाणीव करून गेला. मृत्यूशी दोन हात करीत शेवटी हरलेला भाऊ, आणि त्याच्या पार्थिवावर राखी बांधून साजरे केले गेलेले ‘अखेरचे रक्षाबंधन’ आणि संपूर्ण गावाला पिळवटून टाकणारा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत अश्रू देऊन गेला.मंगळवारी (दि. 5) रोजी गुळुंचे येथील ४६ वर्षीय सचिन हनुमंतराव निगडे यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.
आई- वडिलांचा लाडका, समाजात प्रेमळ आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखला जाणारा सचिन तीन बहिणींचा लाडका भाऊ होता. सर्व बहिणींच्या लग्नानंतरही त्यांचे ऋणानुबंध जपणारा हा भाऊ, त्यांच्या प्रत्येक सुख- दुःखात सहभागी होता.सचिन एमएससीबीमध्ये नोकरी करीत होता. एका अपघातानंतर आलेल्या मानसिक धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच त्याला गंभीर आजाराने ग्रासले. त्याच्या आजारात पत्नीने सेवाभावाने साथ दिली, कुटुंबानेही खचून न जाता साथ दिली. बहिणींनीही वारंवार भेटी देत आपली माया उधळली.
मृत्यूची बातमी समजताच गावात हळहळ पसरली. रात्री उशिरा अंत्यविधीसाठी जमलेले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळींनी सचिनच्या सोज्वळ स्वभावाच्या आठवणींनी आसवे पुसली. आई आणि तिघी सख्ख्या बहिणींच्या टाहोमुळे वातावरण गहिवरून गेलं.अंत्ययात्रा सुरू होण्याच्या तयारीत असताना कुटुंबातील एका चुलत बहिणीने हळूच एक कल्पना मांडली. “यंदाचं रक्षाबंधन येण्याआधीच आपण राखी बांधूया… शेवटचं का होईना, पण बंध जिवंत ठेवूया.” काही क्षणांतच शेजारच्या दुकानातून आणलेल्या राख्या त्या तिघी बहिणींनी सचिनच्या पार्थिवाच्या उजव्या हातावर बांधल्या. एकाच वेळी टाहो उठला. “आता कोणाच्या हातावर राखी बांधू?”
गावकऱ्यांच्या मनात कालवाकालव..
हा प्रसंग पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. गावातील भावकीतील जवळपास २० ते २२ बहिणींनी एकाचवेळी भावाला अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला. गावात अशा प्रकारे राखी बांधण्याची ही पहिलीच घटना होती. सचिनच्या आईच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू, बहिणींच्या थरथरत्या हातांनी बांधलेली राखी, अखेरच्या रक्षाबंधनात उमटलेला भावनांचा कल्लोळ गावकऱ्यांच्या मनात कायमचा कोरल्याने कालवाकालव झाली.




