Junnar News | सह्याद्रीच्या कुशीतलं अदृश्य रत्न ; श्रीक्षेत्र हटकेश्वराला तिर्थक्षेत्राचा दर्जा केव्हा?

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – महाराष्ट्रातील सहयाद्रीपर्वत रांगाचे आगळेवेगळे वैशिष्टये आहे. महाराष्ट्र म्हणजे संताची, वीरांची, युगपुरूषांचीच भूमि नव्हे तर अनादीकालापासून या पर्वतरांगामध्ये देवदेवतांचे वास्तव आढळते, असे म्हटले तर नवल ते काय? होय. अशाच सहयाद्रिच्या पर्वत रांगांमधील पश्चिम घाटावर असलेला पुण्यापासून ९० कि.मी. अंतरावर असलेला व शिवरायांच्या जन्माने पुणीत झालेला जुन्नर तालुका, शिवरायांच्या जन्मभूमीपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर असलेला गोद्रे येथील हटकेश्वर डोंगर अर्थात श्रीक्षेत्र हटकेश्वर देवस्थान. परंतु, अनादिकालापासून प्रसिध्दी न मिळाल्याने अनेक ग्रंथांत उल्लेख असतानाही ते उर्जित अवस्थेत आलेले नाही.
भविष्यात या स्थळाची माहिती भाविकांना व्हावी, तसेच तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळून ते विकसीत व्हावे. जुन्नर तालुक्यातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच हे धार्मिक क्षेत्र व पर्यटनक्षेत्रांमध्ये श्रीक्षेत्र हटकेश्वर, गोद्रेचा समावेश व्हावा.श्री क्षेत्र हटकेश्वरांचा महिमा संत महात्म्यांनी अनेक ग्रंथांत नमूद केलेला आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्र. ११, ओवी क्र. ३६० मध्ये म्हणतात, “नातरी कारवे सूनि वसुंधरी। जैं हिरण्याक्षु रिंगाला विवरी। ते उघडले हटकेश्वरी। जेवी पाताळ कुहर।।’(अर्थ: भगवंताने हिरण्यकशपुला ठार मारल्याने उद्विग्न झालेला हिरण्याक्षु दैत्य आदिमायाशक्तिला काखेत घेवून गुहेत शिरला, तेव्हा सप्तपाताळातील ध्यानस्त बसलेल्या महादेवांना त्याची जाणीव झाल्याने या महासंकटातून आदिमायाशक्तिला मुक्त करणेसाठी त्यांनी हिरण्यकश्यपुला ज्या पाताळरूपी गुहेचे दार उघडून बाहेर काढले ते ठिकाण म्हणजेच हटकेश्वर होय.
काशिखंड अध्याय क्र.७७ अगस्तिऋषींनी प्रश्न केल्याने कार्तिकस्वामी यांनी श्री क्षेत्र हटकेश्वरची माहिती सांगताना ते म्हणतात, ईश्वराचे पश्चिमभागी मोक्षलक्ष्मी विलास आहे. तेथे देवाधिदेव महादेवाने, सर्व देव, ऋषी, यक्ष, राक्षस, शेषनाग व मनुष्य आदींना बोलावून सांगितले की, माझ्या पादुका सप्तपातळी आहेत. तेथे मी ध्यानस्थ बसून ‘हटकेश्वर’ नावाचे शिवलिंग स्थापिले, या शिवलिंगापासून जो अंकुर निघाला, तो सप्तपातळे भेदून गेला. हेच लिंग मूळचे जीवन होय. तद्नंतर भगवान महादेव शिवलिंग रुपाने स्थिर झाले.
ते श्री क्षेत्र काशिविश्वनाथ म्हणून, त्यामुळेच हटकेश्वरास गेल्यास काशिक्षेत्रास गेल्याचे पुण्य लाभते, असे म्हणतात कारण त्या महादेवाच्या सप्तपाताळील पादुका म्हणजेच हटकेश्वर होय. तसेच काशिखंड अध्याय क्र. ३५ मध्ये कालभैरवाच्या हातून ब्रम्हहत्या झाली. तेव्हा महादेवाने त्यास ब्रम्हकमळ हातात घेवून तिर्थक्षेत्राचा प्रवास कराण्यास सांगितले. तिर्थाटन केल्यावर शेवटी हटकेश्वराची मनोभावे पूजा केल्याने ब्रम्हहत्येचे पाप नाहिसे झाले. म्हणूनच की काय आजही पंचक्रोषितील भक्तभावीक गोहत्या वर्ज मानतात. चुकुनही झालीच तर हटकेश्वराच्या डोंगराच्या पंचक्रोषित जाऊन पाच प्रदक्षिणा मारल्याने गोहत्येचे पाप नाहिसे झाले, असे समजतात.
वास्तूराज ५/३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निर्माण केलेल्या घराची, वास्तूची तोडफोड केल्याने वास्तुदोष निर्माण होतात. या वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी कात्यायान ऋषिने हटकेश्वर क्षेत्रामध्ये वास्तूपद तिर्थ निर्माण केले. महादेवाच्या उपस्थितीत कात्यायान ऋषीने त्याचे वास्तूपूजन केले होते. या तिर्थातील पाण्यामध्ये ४८ देवतांच्या पूजनाचे सामर्थ्य असल्याने घरातील दोष तसेच या तिर्थ जलाच्या सेवनाने वास्तुदोष नष्ट होऊन संपन्नता नांदू लागते.दासबोध, वशक १७, समास दहावा यात समर्थ रामदास लिहितात, ‘‘श्रीराम समर्थ। आवरर्णोदकी हटकेश्वर। त्यास घडे नमस्कार। महिमा अत्यंतचि थोर। तया पाताळलिंगाचा।।१।। परंतु तेथे जाववेना। शरीर दर्शन घडेना। विवेके आणावे अनुमाना।। एकंदर या व यासारख्या अनेक ग्रंथांत हटकेश्वराचा महिमा सांगितलेला असून, आपण या क्षेत्रास भेट दिल्यास आपणास काशीक्षेत्राच्या दर्शनाची प्राप्ती होते.
इंग्रज अधिका-याने १८ व्या शतकात हटकेश्वराच्या दर्शनास श्रध्देने न गेल्यामुळे त्याचा घोडा उधळला. ते घोडे पाऊल म्हणून प्रसिध्द आहे. याच अनुभवातून दिलेल्या अहवालावरून तत्कालीन सरकारने शासकीय अधिसूचना २५ एफ दि.१.३.१८७९ अन्वये हटकेश्वराची वार्षिक यात्रा हक्क व मंदिरात जाण्यायेण्याचा रस्त्याचा हक्क प्रदान केलेला आहे.अशा प्रकारे श्री क्षेत्र हटकेश्वराचा ग्रंथांतील माहितीचा आढावा घेतल्यास, श्री क्षेत्र हटकेश्वर पंचक्रोशीत ही अनादिकालापासून देवाधिदेवांची भूमि म्हणून ओळखली जाते. या पंचक्रोषितील भाविक आजही त्या बदद्लच्या संकल्पना मांडत आहेत. ग्रंथांतील पुराव्यांशी जुळतात. म्हणूनच १२ ज्योर्तिलिंगाचे दर्शन जरी झाले, तरी श्री क्षेत्र हटकेश्वराच्या दर्शनानेच ते पूर्णत्वाकडे जाते. मनुष्याच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण होऊन सर्व देवांना त्याचा नमस्कार पोहोचतो.
काळाच्या ओघात अनेक वेळा महाराष्ट्र शासनाकडे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा व वन पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सातत्याने ग्रामस्थ मंडळी प्रयत्न करत आहेत. तो लवकर मिळावा यासाठी शासन स्तरावरून योग्य ते निर्णय घेण्यात यावेत याबाबतची निवेदन वारंवार मा. पालक मंत्री, पुणे जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांना देण्यात आलेली आहेत. वन पर्यटनाच्या माध्यमातून या देवस्थानाचा विकास आराखडा बनवून त्याप्रमाणे त्याचा विकास घडवून आणावा यासाठी वन विभागाकडे देखील ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत.





