शिरूर : सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतातून विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या कारणावरून दहा जणांनी मिळून एका तरुणावर लाठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना दि. २९ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी तपासात अडथळे येत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, तब्बल दोन तपास अधिकाऱ्यांकडून तपास काढून घेतला गेला असून, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या दबावामुळे तपासाची दिशा बदलल्याची जोरदार चर्चा आहे. गणेश रामदास पोखरकर (वय २७, रा. सविंदणे) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी विठ्ठल गेणुजी ढगे, निवृत्ती गेणुजी ढगे, ज्ञानेश्वर गेणुजी ढगे, सनी मारूती ढगे, रवी मारूती ढगे, अमोल मारूती ढगे (सर्व रा. मांदळेवाडी, ता. आंबेगाव) यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, पोखरकर हे वडगाव पीर येथील भैरवनाथ स्टोन क्रशरवर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २९ मार्च रोजी मशागतीसाठी ते त्यांच्या शेतात गेले असताना, दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या दहा जणांनी “शेतातून रस्ता का दिला नाही?” असा जाब विचारून त्यांच्यावर लाठी, काठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची सोन्याची साखळीही गहाळ झाली. यावेळी आरोपींपैकी काहीजण तलवार घेऊन आले होते, मात्र सुदैवाने इतरांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या गुन्ह्याचा तपास प्रथम एका अधिकाऱ्याकडे, नंतर दुसऱ्याकडे देण्यात आला. मात्र, दोघांकडूनही तपास काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या शिफारशीवरूनच शिरूरच्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून संबंधित आरोपींवर कठोर कलमे न लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. या संदर्भात गणेश पोखरकर यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली असून, न्याय मिळावा यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय व प्रशासकीय दबाव नको, अशी मागणी केली आहे. याआधी, २४ फेब्रुवारी रोजी विठ्ठल ढगे यांनी पोखरकर यांच्यावर विहीरीवरील मोटार आणि साहित्याची तोडफोड केल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद चिघळला आहे. दरम्यान, आता सर्वांच्या नजरा शिरूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपविभागीय अधिकारी दबावाला बळी न पडता योग्य आणि पारदर्शक तपास करतात का, याकडे लागल्या आहेत.