pune gramin : वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबांना अलंकारिक पोशाख

सोमवती अमावास्यानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी
परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे वद्य अमावास्येनिमित्त श्री नाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरीच्या उत्सव मूर्तींना पोशाख परिधान करून अलंकारांनी सजविण्यात आले होते. देवाचे अलंकारिक रुप पहाण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवती अमावास्येच्या निमित्ताने पहाटे चार वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी आठ वाजता देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने अभिषेक घालण्यात आले.
सकाळी दहा वाजता उत्सव मूर्तींसमोर भाविकांच्या वतीने दहिभात पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी एक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.देऊळ वाड्यातील दगडी कासवावर दिवसभर सालकरी गोसावी मंडळींचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. धूपारती नंतर श्रीनाथांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र घोडे उड्डाण म्हणजे श्रीनाथांच्या मूळ ठिकाणी नीरा नदी स्नानासाठी मार्गस्थ झाला या पालखी सोहळ्यात सर्व मानकरी, सालकरी, दागिनदार, गोसावी व भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून यात्रा उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. भाविकांच्या राहुट्या व बैलगाड्यांची व्यवस्था तसेच तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही तसेच महिला भाविकांसाठी माता जोगेश्वरी कक्षाच्या वतीने विशेष सुविधा पुरविण्यात आल्या होत्या असे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.




