Pune Gramin | आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊसाचे एकरी उत्पादन वाढवा – दिलीप वळसे-पाटील

प्रभात वृत्तसेवा
पारगाव शिंगवे – राज्यात ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे. यामुळे भविष्यात साखर उद्योग धंद्यामध्ये अडचणी उभ्या राहणार आहेत. ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करणे आवश्यक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे ऐकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे,असे आवाहन भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे,विष्णू काका हिंगे, सचिन भोर, शिवाजीराव ढोबळे, राजूशेठ गावडे, शंकर पिंगळे, कारखान्याचे सचिव रामनाथ हिंगे व सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरू करावा, असे सांगितले. त्यानंतर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे यांनी भागभांडवल व परवानगी दिली. आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा राहिला. कारखाना सुरू झाला. पहिल्या गळीत हंगाम सुरू करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात आला. त्यावेळी साखर कारखाना तोट्यात गेला होता.
त्यानंतर योग्य नियोजन करून कारखाना चांगल्या स्थितीत आला.भीमाशंकर कारखाना साखरेचे उत्पादन घेत असताना सहवीज निर्मिती प्रकल्प होती घेण्यात आला. त्यामधून कारखान्यास चांगले मदत झाली. यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देण्यासाठी झाला. इथेनॉल प्रकल्प सुरू केला याचाही फायदा होणार आहे. भविष्यात बायोगॅस निर्मिती सुरू करण्यात येणार आहे. भीमाशंकर साखर कारखान्याने एफ.आर.पी.पेक्षा चांगला बाजार भाव दिला आहे. काही जण भीमाशंकर कारखान्याला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. कारखान्यांचा कारभार पारदर्शक आहे. असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
कारखान्याला सातव्यांदा पुरस्कार..
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, भीमाशंकर साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ७ वेळा पुरस्कार मिळाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना चांगल्या पद्धतीने कामकाज करित आहेत.कारखाना भाग निधी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार देण्यात येतो. इतर कारखान्याच्या तुलनेत भीमाशंकर साखर ऊसाला चांगला बाजारभाव देत आहे. बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले. डॉ. सुदाम खिलारी यांनी सूत्रसंचालन केले.





