तहसीलदार रमा जोशी यांचे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचरला आक्रोश मोर्चा बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मंचर – बिबटप्रवण क्षेत्रात कृषिपंपासाठी दिवसा वीज देण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंगळवारी (दि. 21) तहसीलदार रमा जोशी यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रांत कार्यालयावर आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथून झाली. मंचर शहरातील बाजारपेठेतून मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर येथे अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांनी आपल्या भावना आणि रोष व्यक्त केला. यामध्ये वनाजी बांगर, अभिलाष घेवारी, मारुती गोरडे, बाळासाहेब वाघ, प्रदीप चिखले यांची भाषणे झाली. कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा व्हावा, बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, या परिसरातील बिबटे पकडून माणिक डोह केंद्राप्रमाणे संवर्धन केंद्रांची संख्या वाढवून तेथे बिबट्यांचे संगोपन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांनी स्वीकारले. यावेळी तहसीलदार रमा जोशी, कार्यकारी अभियंता सुधीर पनिकर आणि वनविभागाच्या वतीने स्मिता राजहंस यांनी आपली भूमिका शेतकऱ्यांसमोर मांडली. कृषीपंपाला दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येईल, तसेच बिबट्यांसंदर्भात ज्या मागण्या आहेत त्याबाबत देखील उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी काशिनाथ दौंडकर, रोहिदास कुटे, प्रकाश कोळेकर, संजय पालेकर, संतोष पवार, एडवोकेट राजू बेंडे, नामदेव पोखरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. काहीकाळ वातावरण तणावग्रस्त यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार, कार्यकारी अभियंता आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले होते. जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्यामार्फ ततातडीने बैठका घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकरी व नागरिक शांत झाले. बिबट्यांना पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, शेतीला वीज पुरवठा होण्याबाबत उपाययोजना झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. – प्रभाकर बांगर, आंबेगाव तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना