Pune Gramin | विठ्ठलवाडीत १२०० किलो निर्माल्य संकलन ; १३ वर्षांचा उपक्रम ठरला यशस्वी

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे – श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या घाटावर गणेश विसर्जन करताना तब्बल १,२०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले. मेन चौक प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.श्रीपांडुरंग विद्यामंदिर येथील शिक्षक प्रवीणकुमार जगताप आणि प्राध्यापक संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही हा उपक्रम यशस्वी झाला.
विठ्ठलवाडीसह तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, वाघोली आणि पुणे अशा विविध ठिकाणांहून आलेल्या गणेशभक्तांनी आपल्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन भीमा नदीच्या घाटावर केले. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात एकूण १,२०० किलो निर्माल्य संकलित झाले.यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, संभाजी शिंदे, पोलीस पाटील शरद लोखंडे, प्रकाश गवारे, ॲड. संतोष गवारे आणि के. टी. कोतवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.हा निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेन चौक प्रतिष्ठानच्या दिनेश राऊत, श्यामराव गवारे, महादेव पवार आणि बाबू यादव या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
बोटीतून मूर्तींचे विसर्जन..
गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी गणेश विसर्जन आपत्कालीन व्यवस्थापनाच्या वतीने जयेश शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवाराने एक बोट उपलब्ध करून दिली. या बोटीच्या साहाय्याने गणेश आंबेकर, बाळासाहेब गोंडावळे आणि चंद्रकांत गवारणे या स्वयंसेवकांनी मूर्तींचे विसर्जन केले. आपली मूर्ती बोटीतून विसर्जित होताना पाहून गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले.श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे गणेश विसर्जन निर्माल्य संकलन पाहताना पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व मान्यवर.





