Pune : ग्रामपंचायतींनी केली ६१ टक्के घरपट्टी वसूल

पुणे : मार्चअखेर जवळ आल्याने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी यावर्षी आतापर्यंत ३३६ कोटी २६ लाख रुपयांची घरपट्टीची करवसुली केली. वसुलीचे हे प्रमाण ६१.६० टक्के इतके आहे. तसेच, पाणीपट्टीतून ४३ कोटी ५५ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली असून, त्याचे प्रमाण ५६.९० टक्के इतके आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व अर्थकारण घरपट्टी आणि पाणीपट्टी या करवसुलीवर अवलंबून असते. ग्रामपंचायतींचे वसुलीचे प्रमाण अधिक असेल, त्या खऱ्या अर्थाने समृध्द बनतात. मात्र काही ग्रामपंचायती सोडल्या, तर बहुतांश ठिकाणी ही करवसुली करणे मोठे अवघड आहे. त्यामुळे गावाच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. यावर्षीही वसुलीचे प्रमाण चांगले असले तरी, समाधानकारक नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनचे म्हणणे आहे. दरम्यान, मुळशी, खेड, मावळ तालुक्यात ६४ टक्क्यांहून अधिक घरपट्टीची करवसुली झाली आहे. तर आंबेगाव तालुक्यात सर्वात कमी ४५.९२ टक्के वसुली झाली आहे.
भोर तालुक्यात ६८ टक्के पाणीपट्टी वसुली करण्यात आली असून, त्यातून ग्रामपंचायतींना दोन कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जुन्नर तालुक्यात सहा कोटी १४ लाख रुपये, मावळमध्ये पाच कोटी ९५ लाख रुपये, बारामतीमध्ये चार कोटी ७२ लाख रुपये, खेडमध्ये तीन कोटी २९ लाख, तर मुळशी तालुक्यात तीन कोटी १६ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींकडून अजूनही पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली सुरू आहे. त्याबाबत वेळोवेळी तालुकास्तरावरून आढावा घेण्यात येत आहे. थकबाकी जास्तीत जास्त वसुली करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. कर वसुलीच्या उद्दिष्टापर्यंत ग्रामपंचायती पोचतील अशी अपेक्षा आहे.
– विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि.प.





