विश्रांतवाडी – पुणे महापालिका हद्दीतील थकीत मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन या मागणीसंदर्भात आमदार बापुसाहेब पठारे यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार यांची मंत्रालयात भेट घेत आमदार पठारे यांनी पुणे महापालिका हद्दीतील थकित मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. याबाबत पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पठारे यांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील मिळकतधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे मिळकतकर भरलेला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज व दंड आकारला जात आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असून ती भरण्यास नागरिक तयार नसल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेलाही कर संकलनात अडचणी निर्माण होत आहे. या करामुळे थकीत मिळकतधारक पालिकेचीही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे थकीत करदात्याला न्याय देण्यासंबंधी शासनाने अभय योजना आणल्यास सामान्य नागरिक संबंधित योजनेच्या माध्यमातून मिळकत कर भरतील. महापालिकेलाही जास्तीत- जास्त महसूल मिळेल, सदर बाब निदर्शनास आणून दिल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या मागणीवर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या योजनेला राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.” – बापुसाहेब पठारे, आमदार, वडगावशेरी