Pune : सरकार सेवेसाठी, दादागिरीसाठी नाही

पुणे : शहरासह जिल्ह्यातील जल आणि वायू प्रदूषण वाढत आहे, त्याची माहिती घ्यावी. आपण रेड अलर्टवर असून, वेळीच ठोस पावले उचलली पाहिजेत, असे सांगत सरकारच्या चुकीमुळे जीबीएस हा आजार पसरला असून, एकाच रुग्णालयात मोफत उपचार देण्याऐवजी सर्व रुग्णालयांत मोफत उपचार मिळावेत.
आधार कार्डवरील पत्ता पाहून उपचार निधी देणे योग्य नाही. सरकार सेवेसाठी आहे, दादागिरीसाठी नाही, असा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कृत्याचा समाचार घेतला. गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी गुरुवारी (दि. ३०) नांदेड फाटा परिसरातील गावांतील विहिरी आणि पाणीपुरवठ्याची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या वेळी महापालिकेकडून बाधित रुग्णांना मोफत उपचारासाठी केवळ एकच रुग्णालय सुरू केले.
खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना एक ते दोन लाख रुपये उपचार निधी दिला जात आहे. तेही आधार कार्ड पाहून. त्यावर पत्ता बाहेरचा असेल, तर उपचार निधी नाही, अशा तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. त्यावर सुळे यांनी माणुसकी म्हणून तरी आधार कार्ड पाहण्यापेक्षा उपचाराला प्राधान्य देऊन शहरातील सर्वच रुग्णालयांत मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
…तर आंदोलन करू
पुणे महापालिकेच्या प्रत्येक मीटिंगमध्ये पाण्यासंदर्भात चर्चा होते. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्याबाबत सूचना देतो, तरीही अंमलबजावणी होत नाही. त्यात आता पाणीपट्टी वाढविण्याचा विचार होत असेल, तर आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही. वाढवली तर पूर्ण ताकदीने आंदोलन करू, असा इशारा सुळे यांनी दिला. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जो होतोय तो दूषित. त्या पाण्यामुळे जलजन्य आजाराची साथ पसरली. पुण्याच्या पाण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
प्रशासन, सरकारमध्ये ताळमेळ नाही
स्मार्ट पुण्यात प्रदूषणामुळे रोगराई वाढत आहे. मग स्वच्छतेच्या करोडोंचा खर्च कुठे होतो. दहा वर्षांत खरंच पुणे किती स्मार्ट झाले, हे पाहावे लागेल. किती समस्या वाढल्या, प्रशासन का कमी पडत आहे. महापालिका अधिकारी एक माहिती देतात, तर आरोग्यमंत्री दुसरीच माहिती देतात, हे गंभीर आहे. यावरून प्रशासनाकडून आरोग्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जाते किंवा प्रशासन आणि सरकारमध्ये ताळमेळ नाही, हे दिसते. या गंभीर विषयावर आरोग्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.





