पुणे | पुणे-गोवा विमानाला तब्बल सात तास उशीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव विमानतळावरून गोव्याला सुटणाऱ्या विमानाला तब्बल सात तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून, विमानांना उशीर होणे नित्याचेच बनल्याने प्रवाशांची चिडचिड होत आहे.
पुणे विमानतळावरून दुपारी साडेबाराला स्पाइट जेटचे एसजी १८५ हे विमान गोव्यासाठी उड्डाण करणार होते. त्यामुळे प्रवासी दोन तास अगोदरच विमानतळावर येऊन थांबले होते. पण, विमानला उशीर असल्याचे विमान कंपनीचे अधिकारी सांगत होते. दिल्लीहून पुण्याला येणारे एसटी १८५ विमान हेच दुपारी गोव्याला उड्डाण करणार होते.
पण, दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाला. त्यामुळे हे विमान साडेपाचला पुण्यात पोहोचले. त्यानंतर ते सहा वाजून ५० मिनिटांनी पुण्यातून गोव्याला सुटले. या विमानात मोठ्या प्रमाणात महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती.
विमानाला उशीर झाल्यामुळे त्यांचे खूप हाल झाले. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर त्यांना विमान उशीरा येत असल्याचे सांगितले. तसेच, नंतर अर्धा अर्धा तासाने विमान कधी उड्डाण करेल हे सांगितले जात होते. त्यामुळे सकाळी गोव्यासाठी घरातून निघालेले नागरिक सायंकाळ झाली तरी पुणे विमानतळावरच होते. विमानतळ प्रशासनाकडून याबद्दल काहीही कारवाई होत नसल्यामुळे अलिकडे विमानाला उशीर होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.





