Pune Ganeshotsav 2026 : प्लाझ्मा-प्रेशर मिडवर 100% बंदी! पुणे पोलिसांचा गणेश मंडळांना थेट इशारा, ढोल-ताशा पथकांवरही लक्ष
Pune Ganeshotsav 2026 : पुणे गणेशोत्सवात प्लाझ्मा आणि प्रेशर मिडवर १०० टक्के बंदी राहणार.

Pune Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरे करणे बंधनकारक आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लाझ्मा आणि प्रेशर मिडवर शंभर टक्के बंदी राहणार असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
प्लाझ्मा आणि प्रेशर मिडमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत पुणे पोलिस आयुक्तालयात ध्वनिक्षेपक यंत्रणांची चाचणीही करण्यात आली आहे. गणेश मंडळांनी प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेसरचा वापर न करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली असून, याबाबत मंडळांची भूमिका स्पष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमबाबतही पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉपपेक्षा अधिक साउंड सिस्टिम वापरली जाणार नाही, अशी भूमिका गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. मात्र, मोकळ्या जागेत स्थिर कार्यक्रमांसाठी सहा बेस आणि सहा टॉप वापरण्याची मागणी काही मंडळांकडून करण्यात आली असून, त्यावरही विचारविनिमय सुरू आहे.
याबाबत अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल. कोणतीही व्यक्ती विशेष असो किंवा व्यापारी असो, पोलिसांच्या निर्णयावर दबाव आणू शकणार नाही, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल झालेल्या मिरवणुकीत सहा ठिकाणी प्लाझ्मा आणि प्रेशर मिडचा वापर आढळून आला. त्यामुळे संबंधितांची संपूर्ण साउंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी काल तब्बल एक हजारांहून अधिक ध्वनी चाचण्या घेतल्या. त्यामध्ये १४८ ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ढोल-ताशा पथकांवरही लक्ष –
ढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला किती ढोल-ताशा पथके ठेवता येतील, याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
लक्ष्मी रोडवरून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सुमारे १८० ते १९० गणेश मंडळांशी पोलिसांची चर्चा सुरू आहे. लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील गर्दीचे नियंत्रण करताना गणेश मंडळांच्या मिरवणुका अडथळ्याविना पुढे जाव्यात, यासाठी नियोजन केले जात आहे.
“प्रेशर मिड आणि प्लाझ्मावर शंभर टक्के बंदी राहणार आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.





