Pune Ganesh Festival 2025: गर्दी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी 600 पोलिस, 400 स्वयंसेवकांना प्रशिक्षण

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. परिमंडळ ५ अंतर्गत हा उपक्रम पार पडला.
दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान शहरभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी गर्दी नियंत्रणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन रिसीलेंट इंडिया, नाशिक येथील प्रशिक्षक राजीव चौबे यांनी केले. यापूर्वी त्यांनी आषाढी व कार्तिकी एकादशी तसेच नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनाचे प्रशिक्षण दिल्याचा अनुभव आहे. या सत्रात परिमंडळ ५ मधील १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले.
कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “गर्दी व्यवस्थापन करताना येणारा आणि जाणारा मार्ग स्वतंत्र असावा, कुठेही क्रॉसफ्लो होऊ नये. पोलीसांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. तसेच प्रत्येक गणेश मंडळाकडे रस्सी, बॅरिकेड्स आणि स्वयंसेवकांची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे,” असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे गणेशोत्सव काळात सुरळीत व सुरक्षित वातावरणात उत्सव पार पडण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.





