Pune : गजानन मारणेला पोलीस कोठडी

पुणे – आयटी कर्मचारी तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना कुख्यात गजानन मारणे व रुपेश मारणे यांनी चिथावणी दिली आहे. त्यामुळे संबंधित तरुण व आरोपींमध्ये जुनी भांडणे आहेत का, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यावर विशेष ‘मोक्का’ न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी गजानन मारणेला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
साथीदारांचा पोलीस शोध घेत असून, त्यांच्या ठावठिकाण्याबाबत गजा उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, घटनास्थळावरचे सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून इतर साथीदारांची नावे निष्पन्न करायची आहेत. आरोपी हा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे व सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी केली.
मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार
पोलिसांनी गजानन मारणेला खोट्या गुन्ह्यात गोवले आहे. किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात जीवे मारण्याचे व मोक्काचे कलम लावले आहे. त्याला त्याला औषधोपचार नाकारले जातात. हे अटक आरोपीच्या मूलभूत मानवधिकाराचे उल्लंघन असून, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असा युक्तिवाद अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. त्यांना दिग्विजय ठोंबरे यांनी सहकार्य केले.





