पुणे: “टीईटी’ची घोटाळ्याची आणखी पोलखोल अटळ

6,685 प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेकडे पडताळणीसाठी दाखल
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) 6 हजार 685 प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झालेली आहे. या प्रमाणपत्रांची पडताळणी फेब्रुवारी अखेर सुरु करण्यात येणार आहे.
“टीईटी’ परीक्षेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब उघड झालेली आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली करुन नापास झालेल्या उमेदवारांना निकालात फेरफार करुन उत्तीर्ण करण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांच्या तपासात 7 हजार 800 उमेदवारांची संख्या पुढे आली आहे. पोलिसांनी “ओएमआर’शीटची कसून तपासणी सुरु केलेली आहे. “टीईटी’ घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी बड्या अधिकाऱ्यांना अटकही केलेली आहे.
काही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्रे दाखल करुन शाळांमध्ये नोकऱ्या मिळविल्याची शक्यताही आहे. यामुळे परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून “टीईटी’ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी मागविली आहेत. काही जिल्ह्यांतून सर्वची सर्व प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झालेली नाहीत. ही प्रमाणपत्रे पडताळणीसाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.




