Pune : फुरसुंगी-उरुळी कचरा डेपोला आग

फुरसुंगी – ऐन हिवाळ्यात फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोला रविवारी दुपारी भीषण आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. तर, महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथे जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचा आरोप कचरा डेपो हटावो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी केला आहे.
दरम्यान, ही आग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून पाणी मारण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. पाणी मारल्याने परिसरात धुराचे लोट व दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाडळे म्हणाले, पालिका प्रशासनाने नागरी घनकचरा अधिनियम २००० नुसार कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करणे गरजेचे असताना सर्व नियम डावलून पुन्हा एकदा उघड्यावर कचरा साचवून डोंगर तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जलस्रोत दूषित झाल्याने गेल्या ३० वर्षांपासून या भागात बारमाही पाणीटंचाई असते.
पालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठाही अनियमित व अपुरा असतो. न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे उल्लंघन करत येथे उघड्यावर कचरा टाकला जात आहे. हा साचलेला कचरा जाळून चुका झाकण्यासाठीच ही आग वारंवार लावली जात आहे.





