Pune: सिंहगड रस्त्यावरील फनटाईम ते विठ्ठलवाडी पूल होणार खुला; वाहतूक कोंडीतून मिळणार स्वातंत्र्य

पुणे : वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या सिंहगड रस्त्यावरील आता स्वातंत्र्य मिळणार आहे. स्वांतत्र्यदिनाचा मुहूर्त साधून १५ ऑगस्ट रोजी फनटाईम थिएटरकडून विठ्ठलवाडी चौकाकडे जाणारा पूल वापरासाठी खुला होणार आहे.
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील ( सिंहगड रस्ता) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने उभारलेल्या सिंहगड रस्ता उड्डाणपुलाचा शेवटचा टप्पा १५ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला होत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी दिली. त्यांनी आज पुलाच्या कामाची पहाणी केली. उर्वरीत कामे तातडीनं पूर्ण करण्य़ाचे आदेश दिले.
पालिकेने ११८ कोटी खर्च करून उभारलेला हा पूल शहरातील सर्वाधिक लांबीचा आहे. या पुलाची एक बाजू २.२ कि.मी. अंतराची आहे. २१ सप्टेंबर २०२१ रोजी याचे काम सुरू झाले. होते. या प्रकल्पातील पहिली बाजू म्हणजे इनामदार चौक ते फनटाईम थिएटर दरम्यानचा भाग नियोजित वेळेच्या सहा महिने आधी पूर्ण झाला.
१ मे २०२५ रोजी तेथून वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे सिंहगड रस्त्यावरून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
पुलाची दुसरी बाजू म्हणजे फनटाईम थिएटरकडून विठ्ठलवाडी चौकाकडे जाणारा मार्ग. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यावरील दोन्ही बाजूंचे रॅम्प तयार केले असून, पुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरणही जवळपास पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी डांबरीकरणही झाले असून उर्वरित भागांवर काम सुरू आहे. पावसामुळे काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले असले तरी पुढील दोन आठवड्यांत ही कामे पूर्ण करून हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
आहे.
असा आहे शेवटचा टप्पा
इंडियन ह्यूम पाईप कंपनीचे गेट ते इनामदार चौकादरम्यानची लांबी १.५ किमी आहे. या रस्त्याचे काम १५ जून पर्यंत पूर्ण करण्य़ाचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, जूनच्या पहिल्या आठवडयापासूनच सतत पाऊस सुरू असल्याने काम लांबत गेले. त्यामुळे आता जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
या कामासाठी ४० कोटींचा खर्च झाला असून धायरी, नऱ्हे, खडकवासला भागातून येणाऱ्या नागरिकांना उड्डाणपुलाचा फायदा होणार आहे. या भागातून आलेली वाहने थेट पुलावरून गेल्याने हिंगणे, आनंदनगर, सनसिटी, माणिकबागेतील नागरिकांची कोंडीतून सुटका होणार आहे.





