Pune : आजपासून दस्तनोंदणीसाठी कार्यालये जादा वेळ राहणार सुरु

पुणे : येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने ऐनवेळी दस्त नोंदणीसाठी होणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविली आहे. त्यानुसार आजपासून (सोमवार दि.3) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
रेडी रेकनरचे नविन आर्थिक वर्षाचे दर हे दि. ३१ मार्च रोजी शासनाकडून जाहीर केले जातात. त्याच दिवशी रेडी रेकनरमध्ये वाढ आहे कि नाही हे समजते. रेडी रेकनरमध्ये वाढ झाली तर नागरिकांना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सुध्दा वाढ होते. त्यामुळे जादा भरावे लागणारे मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.
त्यामुळे मोठ्या शहरांमधील दुय्यम निबंधक कार्यालये रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवावी लागतात. या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ मार्च महिन्यात दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. नविन निर्णयानुसार दुय्यम निबंधक कार्यालये रात्री सव्वा आठ पर्यंत सुरु राहणार आहेत.




