Pune : शिरुर, सोलापूर आणि अहिल्यानगर बस स्थानकावरही गाडेचा मुक्त वावर

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मागील दोन वर्षातील तांत्रिक रेकॉर्ड पोलिसांनी काढले आहे. त्यामध्ये गाडे याचा पुण्यातील स्वारगेट शिवाजीनगर, पुणे स्टेशनच नव्हे, तर शिरुर, अहिल्यानगर आणि सोलापूर शहरातील बसस्थानक परिसरातही मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे.
मात्र स्वारगेट बसस्थानकात तो सर्वाधिक काळ वावरत असल्याचे दिसत आहे. यावरून त्याने अगोदरही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखने गाडेच्या कृत्याला बळी पडलेल्या पीडित महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन ही नेहमी गर्दीने गजबजलेली ठिकाणे आहेत. दिवस-रात्र येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्याच संधीचा फायदा घेत गाडे गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गाडेची कुंडली काढण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. डीएनए चाचणीसाठी त्याचे रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची वैद्यकीय तसेच लैंगिकक्षमता तपासणी करण्यात आली आहे. ज्या बसमध्ये त्याने बलात्कार केला, ती संबंधित बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ताब्यात घेतली आहे.
गाडेने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. मोबाईलचा शोध अद्यापही सुरू आहे. त्याचे मोबाईल संभाषण, तसेच त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करण्यात येत आहे. एकंदर मिळालेली माहिती पाहता, गाडे याने गुन्हेगारी कृत्यासाठी बसस्थानके हेरून ठेवल्याचे दिसून येते. गाडेवरचे यापूर्वी दाखल असलेले गुन्हे पाहिले तर सर्वाधिक गुन्हे महिलांची लुटमार केल्याचे आहेत.





