Pune: जेईई, नीटसाठी मोफत प्रशिक्षण; एनसीईआरटीद्वारे साथी पोर्टलवरून विद्यार्थ्यांना सुविधा

पुणे – नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (एनसीईआरटी) वतीने विद्यार्थ्यांना जेईई, नीटच्या परीक्षांच्या तयारीसाठी “साथी’ पोर्टलच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संयुक्त प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आणि मदत करण्यासाठी साथी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यास संसाधने उपलब्ध आहेत. सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना https://sathee.prutor.ai या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक साहित्य, व्हिडिओ धडे, मॉक टेस्ट आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली आहे. पोर्टलवर साइन अप केल्यानंतर, विद्यार्थी विविध परीक्षांची तयारी करू शकतात. त्यांना थेट धडे, शिकवणी, एनसीईआरटीवर आधारित पुस्तके आणि व्हिडिओ सोल्यूशन्समध्ये पाहता येतील.
इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण असलेल्या भागात हा कार्यक्रम डीटीएच चॅनेलद्वारे प्रसारित केला जातो. एक चॅटबॉटही उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांचे नाव, ई-मेल पत्ता आणि शैक्षणिक माहिती साथी पोर्टलवर भरावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षांची निवड करून नोंदणीनंतर विद्यार्थी थेट प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.





