Pune : खासगी रुग्णालयात मोफत बेड सुविधा

पुणे, दि. 14 – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्या रोगांवर उपचार होत नाहीत आणि रुग्णाची आर्थिक स्थिती नसेल त्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांत “फ्री बेड’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सोय महापालिकेच्या आरोग्य योजनेंतर्गतच करण्यात आली आहे. रुग्णांना मोफत बेडची सुविधा देणे संबंधित खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे.
ही सुविधा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना, पिवळ्या रेशनकार्डधारकांना देण्यात येते. ही व्यवस्था रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्येच असेल. फ्री बेड सुविधेअंतर्गत राखीव खाटांचे उपलब्धतेनुसार रुग्णांना उपचार मिळू शकतील.

आवश्यक कागदपत्रे…
डॉक्टरांचे खर्चाचे अंदाजपत्रक
ओळखपत्राची छायांकित प्रत.
रेशनिंगकार्डची छायांकित प्रत
महापालिकेचे हमीपत्र येथे मिळेल
मुख्य मनपा भवन, आरोग्य विभाग, रूम नं. 324,
तिसरा मजला, शिवाजीनगर
दूरध्वनी क्र.020-25501233 किंवा 020-25501227
औंध रुग्णालयामधील तपशील
राखीव फक्त जनरल वॉर्डसाठी कार्डिऑलॉजी आणि कार्डीऍक सर्जरी विभाग सोडून बेड चार्जेस, कन्सल्टीग चार्जेस, आयसीयू आणि आयसीसीयू ऑपरेटीव्ह चार्जेस, डायग्नोस्टीक टेस्ट या सर्वांसाठी रुग्णास 100 टक्के सवलत मिळते; परंतु औषधे, डिस्पोजेबल्स, इम्प्लांटस, स्टेंटस इत्यादींचा खर्च रुग्णांना करावा लागेल.
कार्डिऑलॉजी विभागातील सवलत
प्रतिवर्षी 50 रुग्णांची अँजिओग्राफी केली जाणार. यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये सवलत.
प्रतिवर्षी 12 रुग्णांची अँजिओप्लास्टी केली जाणार. यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची सवलत मिळणार (फक्त एका स्टेंटचा खर्च मिळणार)
प्रतिवर्षी 20 रुग्णांवर बायपास सर्जरी (सीएबीजी) केली जाणार. प्रत्येकी 70 हजार रुपयांची सवलत मिळणार. तसेच वॉल्व्हचा संपूर्ण खर्च रुग्णाला द्यावा लागणार. (कार्डिओलॉजी विभागातील सवलत “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ अशी आहे.)





