अखेर चार वर्षांचा अपहरण झालेला डुग्गू आई-वडिलांच्या कुशीत परतला! वाचा नेमकं काय घडलं?

पुणे – पुण्यातील हायप्रोफाईल परिसरातून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेल्या चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. एका कामगाराजवळ सोडून तो पसार झाल्यानंतर त्या कामगाराने पालकांना माहिती दिली. त्यानंतर या मुलाला सुखरूप मिळविण्यात यश आले आहे. अपहरणकर्ताच चिमुरड्याला सोडून पसार झाला.
स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण झाले होते. त्याचे वडिल डॉक्टर आहेत. आई देखील मेडिकल फिल्डमध्ये काम करत असून, त्यांची स्वत:ची लॅब आहे.
स्वर्णवला त्याचा १४ वर्षांचा मामा शाळेत सोडण्यास घेऊन जात होता. यादरम्यान, शाळेत जातेवेळी चार वर्षीय मुलाचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते. काही वेळाने हा प्रकार उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, आज अपहरण कर्त्यानेच या मुलाला पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ आणले. येथे एक कामगरा बसलेला होता. त्याच्याकडे या मुलाला सोडले आणि मी दहाच मिनिटांत वापस येतो, असे म्हणून निघून गेला. पण, तो बराच वेळत आला नाही. तर, मुलगा देखील रडू लागल्याने त्या कामगाराने त्याची पिशवी पाहिली. त्यात मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने संपर्क साधला. त्यावेळी पालकांनी ही माहिती पोलीसांना दिली.
तसेच, मुलगा तोच आहे का हे व्हॉटसअप व्हिडीओ कॉलकरून खात्री केली आणि त्याला घेण्यासाठी धाव घेतली. त्याला सुखरूप पाहून भरल्या डोळ्यांनी कुटूंबाने हुश्श केले आणि पोलीसांना देखील सुटकेचा श्वास सोडला.




