PUNE: भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी चार आराखडे

पुणे – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची भिडे वाड्याची जागा महापालिकेने मंगळवारी पहाटेपर्यंत कारवाई करून अखेर ताब्यात घेतली. दरम्यान, या वाड्यात स्मारक तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुण्यातील चार नामवंत वास्तू विशारदकाकडून (आकिटेक्ट) आराखडे आले आहेत. या आराखड्यांचे आयुक्तांपुढे सादरीकरण केले जाणार आहे. त्यातील एका आराखड्यांची निवड केली जाणार असून हे सादरीकरण पुढील आठवड्यात केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेच्या मुख्य सभेने २००८ मध्ये हा वाडा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. याविरोधातील न्यायालयीन लढा १३ वर्षांनंतर महापालिकेने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जिंकला. भिडेवाड्याची जागा एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने कडेकोट पोलिस बंदोबस्तात सोमवारी मध्यरात्री भिडे वाडा ताब्यात घेण्याची कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी पहाटे पावणेचार वाजेपर्यंत जमीनदोस्त केला.
मंगळवारीही केली याचिका दाखल
भिडेवाड्याची जागा एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. पण या जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावेळी भूसंपादनाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा या याचिकेची सुनावणी झाली.
त्यावेळी पुणे महापालिकेने हा वाडा जमीनदोस्त केल्याचे तसेच तो रात्रीच ताब्यात घेतल्याचे फोटो न्यायालयात सादर केले. त्यावर न्यायालयाने याचिकेत आता काहीच अर्थ राहिला नाही, असे सांगून याचिका फेटाळली. अशी माहिती पुणे महापालिकेच्या विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी दिली.





