Pune : जीबीएसचे चार नवे रुग्ण ६१ जणांना डिस्चार्ज

पुणे : गुलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) नव्याने चार रुग्ण सापडले असून, शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १७० वर पोहोचली आहे. त्यातील ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ६१ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच जीबीएस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषत: धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपयायोजना केल्या जात आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रूग्णांपैकी १३२ रूग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. बाधितांमध्ये ३३ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८६) ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २१ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.
जीबीएसची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २२
१० ते १९ – २३
२० ते २९ – ३८
३० ते ३९ – २१
४० ते ४९ – २२
५० ते ५९ – २५
६० ते ६९- १४
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ३
ससून रुग्णालयात जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे आणि इंजेक्शन उपलब्ध आहेत. जवळपास पाचशे इंजेक्शन आतापर्यंत उपलब्ध केले असून, नव्याने शंभर इंजेक्शन महापालिकेने दिले आहेत. दरम्यान, ससूनमध्ये आज दिवसभरात पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, तीन रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. त्यामध्ये एका लहान मुलांचा समावेश आहे.
– एकनाथ पवार – अधिष्ठाता, ससून रूग्णालय





