पुणे : पुणे वन परिक्षेत्रातील वढू खुर्द आणि तुळापूर भागात वन विभागाने अवैध आरागिरणींवर कारवाई करत मोठी मोहीम राबवली. या कारवाईत अवैधरित्या सुरू असलेली आरायंत्रे जप्त करून संबंधितांवर भारतीय वन अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
गुरूवारी सकाळी वन विभागाच्या विशेष पथकाने वढू खुर्द येथील रोहित ढमाले आणि तुळापूर येथील खंडू शिवले यांच्या अवैध आरागिरणींवर छापा टाकला. छाप्यादरम्यान वनसंपत्तीचे अवैध रूपांतरण करणारी यंत्रसामग्री आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.
या मोहिमेचे नेतृत्व सहायक वनसंरक्षक, पुणे चे मंगेश ताटे आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केले. त्यांच्यासोबत वनपाल वैभव बाबर (आरागिरणी), शीतल खेंडके (हडपसर), तसेच वनरक्षक बाळासाहेब जिवडे (वाघोली) आणि काळुराम कड (आरागिरणी) यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे वढू खुर्द आणि तुळापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वनसंपत्तीच्या विनाशाला प्रतिबंध घालण्यासाठी अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
अवैध वृक्षतोड आणि आरागिरणींबाबत तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, जेणेकरून त्वरित कारवाई करता येईल, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.