Pune: मोकाटे यांना संधी म्हणजे विकासाची नांदी; शिवसेना शहरप्रमुख थरकुडे यांचे प्रतिपादन

पुणे – मतदारसंघातील सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी विकासकामे केली. त्यांच्या नगरसेवक आणि आमदारकीच्या काळात कोथरूडच्या विकासाला मिळालेली गती मागील दहा वर्षांत मंदावली. त्यामुळे कोथरूडचा सर्वांगीण विकासासाठी चंद्रकांत मोकाटे यांना संधी म्हणजे विकासाची नांदी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी कोथरूड गावठाणातील म्हातोबा देवाचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात केली. यावेळी माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, माजी नगरसेविका वैशाली मराठे, राजू मराठे, संजय मोकाटे, उमेश भेलके, अॅड. शिवाजी भोईटे, दत्तोबा वांबीरे, शिवाजी गाढवे, बाळासाहेब खैरे, राजेश पासलकर, राजू मगर, भगवान कडू यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्वेनगर-वारजे कॅनाॅलवर रस्ते बांधले, चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी आंदोलन केल्यावर भूमीपूजन झाले आणि आज चौक वाहतुकीसाठी खुला झाला. जनेतेच्या समस्या, अडचणींची जाण असणारा आमदार आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती, एकता कॉलनी या परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वृद्ध व्यक्तींनी स्वत: भेट घेऊन मोकाटे यांना आशिर्वाद दिले.
मी कोथरूडमध्ये लहानाचा मोठा झालो. कोथरूड, पाषाण, बावधनकरांनी मला भरभरून दिले. मी कधीही कुणावर टिका केली नाही, करणार नाही. मात्र, कोथरूडच्या विकासासाठी मी नेहमीच पुढे असेल. जुने-नवीन शिवसैनिकांसह कोथरूडकारांनी निवडणूक हातात घेतली. पदयात्रेवेळी नागरिकांकडून आपुलकीची विचारपूस होते यातूनच सर्वकाही स्पष्ट होते, असे महाविकास आघाडी उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.





