Pune : लोककला केंद्रांचा डान्स बार

पुणे : महाराष्ट्र सरकारची मान्यता असलेल्या लोककला केंद्रामध्ये लोककलावंतांऐवजी डीजे वाजवला जात असून, त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या लोककला केंद्रांना डान्स बारचे स्वरूप आले असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र लोककला संघटनेने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करून कारवाईची मागणी केली.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे म्हणाले, की महाराष्ट्रात सरकारी परवाना प्राप्त असलेली ६० ते ६५ लोककला केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील लोककला जपण्यासाठी या लोककला केंद्रांना परवानगी देण्यात आली होती. ढोलकीवादक, पेटीवादक आणि गायिका या कलाकारांना संधी देण्यात अटीवरच त्यांना हे परवाने देण्यात आले आहेत. मात्र, यातील काही कला केंद्रांवर या कलाकारांना संधी देण्याऐवजी डीजे वाजवण्यात येत आहे.
या वेळी प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर देखील उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, की या डीजेंमुळे या लोककला केंद्रांना डान्सबारचे स्वरूप आले असून, डीजे वाजवल्याने शासनाच्या परवान्याचे उल्लघंन होत आहे. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून, काही कलावंतांनी आत्महत्या केली आहे. या संगीतबारी मालकांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी करत आलो आहोत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
महाराष्ट्रातील लोककला जपणे हा या लोककला केंद्रांना परवाना देण्यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, जर कलाकारांवरच उपासमारीची वेळ येत असेल, तर या केंद्रांचा फायदा काय, असा प्रश्न पुणेकर यांनी विचारला. या केंद्रांवर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि गरज पडल्यास आमच्या मागण्यांसाठी आंदोलनही करू, अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.





