Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून राजारामपूल ते फनटाइमपर्यंत सुमारे दोन कि.मी.चा उड्डाणपूल उभारला आहे. या पुलाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि. १ मे या दिवशी करण्यात आले. मात्र, अवघ्या दोन आठवड्यातच या पुलाच्या दोन गर्डरला जोडणाऱ्या भागाला तडा गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी भेग पडली आहे.
या ठिकाणचा काँक्रीटचा तुकडा खाली पडला आहे. सुदैवाने येथून कोणतेही वाहन जात नसल्याने दुर्घटना टळली. मात्र, या प्रकारानंतर महापालिका प्रशासनाकडून असे काहीच घडले नसल्याचे सांगत हा प्रकर दडपण्याचा प्रकार केला. मात्र, या भेग पडलेल्या भागाचा व्हिडीओ आणि फोटो असल्याचे समोर येताच, काँक्रीटीकरणा दरम्यान चूक झाल्याचे मान्य करीत ठेकेदारास तत्काळ दुरूस्ती करण्यास सांगण्यात आल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेकडून सुमारे १२५ कोटी रुपये खर्चून सिंहगड रस्त्यावर तीन टप्प्यात उड्डाणपूल उभारले जात आहेत. त्यात, पहिल्या टप्प्यात राजारामपूलावर स्वारगेट येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फनटाइम पर्यंतचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र, या कामानंतर आता अनेक ठिकाणी सुरू केलेल्या पुलाचे काम अर्धवटच ठेवल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कामात विठ्ठलमंदीराच्या कमानीच्या समोरील बाजुलाच हा प्रकार घडला आहे.
पावसाचे पाणीही रस्त्यावर…
या पुलावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा कुचकामी असल्याचे मंगळवारी झालेल्या पावसाने समोर आले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही हे पाइप तसेच नुसते बसविण्यात आले असून ते एकमेकांना जोडण्यातच आलेले नाहीत. परिणामी, पावसानंतर या पाइपमधून मोठ्या प्रमाणात पाणी थेट रस्त्यावर आले. या पाण्याचा वेग एवढा मोठा होता की, अनेक ठिकाणी पाण्याच्या धारा थेट धबधब्यासारख्या मुख्य रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागला. या शिवाय, पुलावरही तीन ते चार ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
महापालिका म्हणते ही प्रसरण जोडणी
ही माहिती मिळताच संबधित ठेकेदारास सूचना करण्यात आल्या आहेत. पूलाला भेग पडलेला भाग एक्सपांशन जाॅईंटचा ( प्रसरण जोडणी) असल्याचा खुलासा महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी केला आहे. हा भाग रिकामा ठेवणे अपेक्षीत असताना तो काॅक्रीट करण्यात आला त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मात्र, पूर्ण पूलावर इतर कोणत्याही ठिकाणी असे सिंहगड एक्सपांशन जाॅईंट नाहीत का आणि ते खुले का ठेवण्यात आले नाहीत अशी विचारणा केली असता प्रशासनास त्याचे कोणतेही उत्तर देता आले नाही.





