Pune : गुढीपाडव्यासाठी फुलांचा बाजार बहरला

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा रविवारी (दि. ३०) आहे. यादिवशी हिंदू नववर्ष सुरू होत असते. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात फुलांची आवक वाढली असून, जिल्ह्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातून मोठी आवक झाली आहे. याशिवाय राज्यातील इतर भागांतून अल्प आवक झाली आहे. विविध प्रकारची फुले बाजारात दाखल होत आहेत.
पाडव्यासाठी विशेषत: झेंडूला सर्वाधिक मागणी असून, शेवंती, गुलछडी, आस्टर आणि मोगऱ्याचीही खरेदी होत आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, हे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत.
का वाढली आवक?
मार्केट यार्डात आवक वाढली; दरातही ३० ते ४० टक्क्यांनी वाढवर्षभर फुलांची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत होती. त्यामुळे भाव तेजीत असल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी फुलांची जास्त लागवड केली आहे. त्यातच गुढीपाडव्यासाठी माल राखून ठेवला असल्याने आवक जास्त होत आहे.
गुढीपाडवा जवळ आला आहे. सध्या मार्केट यार्डात आवक व मागणी जास्त आहे. शहर, उपनगरांसह जिल्ह्यातील विक्रेत्यांकडून फुलांची खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे.
– सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड
फूल बाजारातील उलाढाल वाढली असली, तरी अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. बाजारात
शनिवारी (दि. २९) फुलांची मोठी आवक होण्याचा अंदाज आहे.
– अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल बाजार अडते असोसिएशन
फुलाचा प्रकार घाऊक बाजारातील किलोचे भाव शुक्रवारची आवक
(किलोमध्ये)
(कंसात मागील वर्षातील भाव)
झेंडू २० ते ४० (७० ते ८०) ४५ हजार २९६
शेवंती ८० ते १५० (१५०-२५०) २ हजार १४२
गुलछडी २५० ते ३०० (२५०-३००) ५ हजार ४०४
अॅस्टर १२० ते १८० (१२०-१८०) ४ हजार ४२४
मोगरा ७०० ते ८०० (७००-८००) ८७०





