Pune : शिक्षकांसाठी पाच दिवसीय कार्यशाळा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व दिल्लीतील एनसीईआरटी, परख यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ मार्च या कालावधीत इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी यशदा येथे पाच दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शिक्षकांचे समृद्धीकरण करण्याच्या अनुषंगाने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विद्या प्राधिकरण संचालक राहुल रेखावार, परखचे विभागप्रमुख डॉ. इंद्राणी भादुरी आदी उपस्थित असणार आहेत. विवेक गुप्ता, विशाल पंजनकर, आनंद कृष्णास्वामी, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. शिवानी लिमये, श्रीधर नागरगोजे, सुवर्णा देशपांडे आदी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी शिक्षण संचालक शरद गोसावी, संपत सूर्यवंशी, डॉ. महेश पालकर, कृष्णकुमार पाटील, राज्यमंडळ सचिव देविदास कुलाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र स्तरावर देशातील सर्व बोर्डांना समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू असून, ही कार्यशाळा समग्र प्रगतिपत्रक माध्यमिक स्तर व प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण या विषयावर होणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ वरही चर्चा होणार आहे. विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनात्मक अभ्यासावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकला जाणार आहे.
राज्य मंडळाकडून निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका अधिकाधिक अचूक व उच्चतम दर्जाच्या व्हाव्यात, या दृष्टीने या कार्यशाळेस अधिक महत्त्व आहे. भविष्यातही विविध बोर्ड समान पातळीवर आल्यास महाराष्ट्र राज्य शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर राहावे, असा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.





