Pune: ‘इंद्रायणी’चे प्रदूषण रोखण्यासाठी अखेर हालचाली

पुणे – इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) अखेर हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी नदीतील प्रदूषणाचे निरीक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. पुण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्याने इंद्रायणी नदी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि संबंधित उद्योगांचे चोवीस तास देखरेख आणि नमुने घेणे सुरू केले आहे.
इंद्रायणी नदीत येणारे सांडपाणी कमी करण्यासाठी आळंदी नगरपरिषद, देहू गाव नगर पंचायत, देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
इंद्रायणी नदीचे पर्यावरणीय आरोग्य जतन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रयत्न करत आहे. या उपाययोजनांतून नैसर्गिक अधिवास आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य राखणे हे उद्दिष्ट आहे, असे एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले.
या गोष्टी आवश्यक
– नैसर्गिक पाणवठ्यातील पाण्याची गुणवत्ता राखणे
– नदीचा नैसर्गिक प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी बंधाऱ्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे
– सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवणे
– स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी निश्चित करणे
– नदी प्रदूषण रोखण्याचे महत्त्व समजण्यासाठी जनजागृती मोहीम.





