Pune : अनधिकृत प्लॉटिंग, उत्खननाबाबत गुन्हे दाखल करा – महसूलमंत्री

पुणे : शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटिंग करून ते विकणे, तसेच अवैध उत्खननप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसांत कारवाई करून याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशही महसूलमंत्री यांनी दिले आहेत.
मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे आदेश देण्यात आले. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मात्र, ती पूर्णपणे काढण्यात आलेली नाहीत.
विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करू नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरून घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील, तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसांत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी दिले.





