पुणे : शिक्षण आयुक्तांच्या आढावा भेटीची धास्ती

पुणे –राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण आयुक्तपदाची सूत्रे सूरज मांढरे यांनी स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. शिक्षण विभागातील प्रमुख शिक्षण संचालक कार्यालयांना भेटी देवून कामकाजाचा आढावा घेण्याचा आठवड्याभराचा त्यांचा कार्यक्रमही निश्चित झालेला आहे. नवे शिक्षण आयुक्त कामाकाजाचा आढावा घेणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कार्यालयातील साफसफाई ते विविध फायली, रजीस्टरचे अपडेशन या सर्वच कामकाजात अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाले आहेत.
गेल्या काही वर्षांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अजब कारनाम्यामुळे शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. आता शिक्षण विभागाला चांगली प्रतीमा निर्माण करण्याच्या दृष्टीने नव्या शिक्षण आयुक्तांची वाटचाल अपेक्षित आहे. आधी पुण्यातील मुख्य कार्यालयांना भेटी देवून आढावा घेण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
यात 17 मार्चला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, 22 मार्चला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, 23 मार्चला प्राथमिक शिक्षण संचालनालय, 24 मार्चला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 29 मार्चला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, 30 मार्चला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ याप्रमाणे मांढरे यांचा कार्यालय भेटीचा कार्यक्रम असणार आहे.
परीक्षा परिषदेपासून सुरुवात
“टीईटी’ घोटाळ्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाची नाहक बदनामी झाली. होळीच्या मुहुर्तावर मांढरे यांनी याच कार्यालयाला आधी वठणिवर आणण्यासाठी पहिली भेट देण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. शिक्षण आयुक्तांच्या भेटीदरम्यान प्रत्येक कार्यालयाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे कार्यालयातील कामकाजाची माहिती सादर करावी लागणार आहे. यात कार्यालयाची रचना, प्रमुख कामे, आजवरच्या प्रमुख उपलब्धी, ठळक कोर्ट, विधीमंडळ, लोकआयुक्त प्रकरणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांची आस्थापनाविषयक प्रकरणांची स्थिती, आगामी गुणवत्ता वर्धनासाठी केलेले नियोजन यांचा समावेश सादरीकरणात ठेवावा लागणार आहे. संबंधित कार्यालयातील संचालकांनीच सादरीकरण करण्याचे बंधनही घातले आहे.





