pune : मिठाई विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई
pune :

५५ लाखांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त
pune : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ भागांत प्रशासनाने तपासणी केली.
या वेळी काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आढळल्याने मिठाई विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत निकृष्ट अन्नपदार्थ वापरून तयार केलेली, अस्वच्छ, तसेच विनापरवाना साठवून ठेवलेली मिठाई, कँडी, चॉकलेट आणि सुकामेवा मिळून सुमारे ५५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.
एफडीए ने गणेश पेठेतील दोन ठिकाणी छापे टाकले. यामध्ये वर्धमान एंटरप्रायझेस येथे केलेल्या कारवाईत ८१३ किलो अन्ना मलई मिठाई, १ हजार २९६ किलो इमली जेली आणि ८१२ किलो लव्हली कँडी असा एकूण १७ लाख ८२ हजार ९३२ रुपयांचा साठा जप्त केला.
हे पदार्थ संशयित निकृष्ट, असुरक्षित व लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयातून जप्त केले, तसेच याच भागातील न्यू पांडियन एंटरप्रायझेसमधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा सुमारे ५८ हजार ६२० रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. हे पदार्थ असुरक्षित असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रशासनाने या सर्व पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल आणि मुदतीची तपासणी करावी, असे आवाहनही एफडीएचे सहआयुक्त दिगांबर भोगावडे यांनी केले आहे.





