Pune : बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

पुणे : बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थांची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून, त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र, काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ॲनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाणार आहे.
नियमांनुसार विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनने सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज ॲनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरच्या ऐवजी ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास, संबंधितांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, तत्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाणार आहे.





