नारायणगाव : हस्ताई अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या शीतगृहाचा फायदा पंचक्रोशीतील शेतकर्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (दि.3) नारायणगाव येथील जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ यांच्या स्व मालिकीच्या हस्ताई अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या शीतगृहाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. महादेव वाघ, मनोहर वाघ, प्रकाश वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी कृषीरत्न अनिल मेहेर, माजी आमदार अतुल बेनके, आशा बुचके, कृषी आयुक्त सूरज मांढरे, डॉ. एस. के. सिंग, केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, डेक्कन व्हॅलीचे सुनिल वामन, रघुनाथ लेंडे, संतोष खैरे, तहसीलदार सुनिल शेळके, गुलाब नेहरकर, अंजली वामन, श्रीराम गाढवे, मंगेश भास्कर, दहा ड्रम थेअरीचे कांबळे, राहुल बनकर, राजु औटी, डॉ. राहुल घाडगे, जयसिंग रायकर, कृषी विभागाचे केंद्रस्तर व राज्य स्तरावरील अधिकारी, सतिष नेहरकर, संगिता वाघ, लक्ष्मण मंडलिक, टी. आर. वामन आदी उपस्थित होते. विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत देशातील शेतक-यांशी संवाद साधून राज्य व विभागनिहाय शेतीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शिवराजसिंह चौहान जुन्नर तालुक्याच्या दौ-यावर आले होते. दरम्यान, महादेव वाघ यांनी स्वतः पिकवलेली द्राक्षे, फळे, भाजीपाला शितगृहात प्रक्रीया करुन परदेशात निर्यात केली जात असल्याचा अभिमान असल्याचे चौहान यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी द्राक्षशेतीच्या बागांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांशी संवाद साधुन समस्यांची माहिती घेतली. कार्यक्रमाचे संयोजन गणेश वाघ व अमोल वाघ यांनी केले. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शेतीवर आधारीत व्यवसायात करीअर करीत असल्याचा आदर्श वाघ परिवाराने दाखवून दिला आहे. – माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य बाजींद कृषी पर्यटन प्रकल्पाची घेतली माहिती उद्योजक लक्ष्मण मंडलिक यांच्या बाजींद कृषी पर्यटन प्रकल्पाचा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आढावा घेतला. यावेळी पर्यटकांच्या सहभागातून कशी मदत घेतली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. भुईमुगाच्या शेंगा वेचणे, ढोबळी मिरची काढणी, जांभूळ व आंब्याच्या बागेतील फळांची साठवण यासारख्या शेतकामात पर्यटक सहभागी होत असल्याचे दाखविण्यात आले. उद्योजक लक्ष्मण मंडलिक यांच्या बाजिंद कृषी पर्यटन प्रकल्पाची उलाढाल, स्थानिकांना मिळणारा रोजगार, शाश्वत शेतीची दिशा व देशी-विदेशी पर्यटकांच्या सहभागाबद्दल माहिती देण्यात आली. प्रयोगाशील पर्यटन प्रकल्पामुळे शेतीला नवसंजीवनी मिळेल आणि कार्यपद्धती देशपातळी आदर्श ठरेल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.