Pune : शेतकर्यांचा अंतरपिकांकडे कल

लोणी देवकर : सध्या इंदापूर तालुक्यात ऊस पिकामध्ये आंतरपिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना आंतरपिकापासून मिळणार्या उत्पन्नामुळे अधिकचा आर्थिक आधार मिळत आहे.
इंदापूर तालुका हा राज्यामध्ये उसाचे आगार समाजाला जातो. ऊस पिकामध्ये हंगामनिहाय मका, गहू, ज्वारी, कांदा, हरभरा, मिरची, बटाटा, कोथंबीर, गवार आदी विविध पिकांची आंतरपिके शेतकरी वर्ग घेत आहे. या आंतरपिकांपासून ऊस या मुख्य पिकाच्या सरासरी उत्पन्नावर काहीही परिणाम होत नसल्याची माहीती उत्पादक शेतकर्यांनी दिली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस पिकात आंतरपिके शेतकर्यांनी घ्यावीत, अशी संशोधनाअंती शिफारस केलेली आहे. ऊस पिकात काही ऊस उत्पादक शेतकरी एकाच वेळी एक, दोन किंवा तीन प्रकारची आंतरपिके घेत असल्याचे दिसून आले आहे. ऊस पिकात मक्याचे आंतरपीक मोठ्या प्रमाणावरती घेतले जाते.
ऊस पिकासाठी दिलेली रासायनिक खते, पाणी हे आंतरपिकांना आपोआप मिळत आहे तसेच आंतरमशागतीसाठी फारसा वेगळा खर्च येत नाही. त्यामुळे ऊस पिकातील आंतरपिकांचा उत्पादन खर्च हा अत्यल्प येत असल्याने आंतरपिकेही शेतकर्यांना आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत आहेत. या आंतरपिकापासून मिळणारा पैसा ऊस पिकासाठी अथवा इतर पिकांसाठी भांडवल म्हणून किंवा घरखर्चासाठी शेतकर्यांना उपयोगी पडत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.




